महामार्गावरील वेरळ, आवाशीसह परशुराम घाटात वाहतूक कोंडी

खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी येऊ लागले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ, आवाशी व परशुराम घाट या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. रात्री निघालेल्या वाहनचालकांना रत्नागिरी, सिंधुदुर्गातील गावात पोचण्यासाठी १० ते २० तास लागत आहेत. वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनाचा बोजवारा उडत असून, वाहनचालकांना तिष्टत उभे राहावे लागत आहे. पुढील दोन दिवसांत त्यात भर पडणार असल्याने सुयोग्य नियोजनाची गरज असल्याच्या सूचना चाकरमान्यांकडून येत आहेत.

वेरळ व आवाशी नजीक राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तर परशुराम घाटात एक लेनची संरक्षक भिंत कमकुवत झाल्यामुळे गेले दोन महिने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्या ठिकाणी वाहनचालकांची कुचंबणा होत असून तासनतास रांगेत तिष्ठत बसावे लागत आहे. या ठिकाणी संबंधित विभागाचे कोणीही अधिकारी फिरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा फटका पुढील दोन दिवस कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना बसणार आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस पडत राहिला तर मात्र चाकरमान्यांची मोठी पंचाईत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्गावर एकच गर्दी झाली असून गणेशभक्त मिळेल त्या वाहनाने गावी निघालेला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, तुटलेल्या साईडपट्ट्या, अधूनमधून येणारा पाऊस यामुळे मार्गावर साचलेला चिखल, अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेली रस्त्यांची काम अशा अनेक अडचणींना सामोरे जात चाकरमान्यांचा प्रवास सुरू आहे.

वेरळ, आवाशी आणि परशुराम घाट याठिकाणी राष्ट्रीय बांधकाम विभागामार्फत काम सुरू असून, या ठिकाणी वाहने सावकाश चालवावी, तसेच वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळावी- पंकज गोसावी, अभियंता, बांधकाम विभाग

एकाच मार्गामुळे अपघाताची भीती
खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरीही कशेडी ते पशुराम घाटा दरम्यान ४४ किमीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भर पावसात कामे सुरू आहेत. त्यामुळे तिथे एक लेन सुरू आहे. दोन्ही बाजूंची वाहने एकाच रस्त्यावरून जात असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 25/Aug/2025