रत्नागिरी : गणेशोत्सव काळात पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा व त्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा तसेच सर्व पंपांवर हवा, पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा मोफत व सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी एचपीसीएल, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम तसेच अशोका गॅस या कंपन्यांच्या प्रतिनिधींना लेखी सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. या काळात गणेशोत्सवासाठी चाकरमानी विविध वाहनांनी कोकणात येत असतात. या कालावधीत वाहनांची संख्या वाढणार असल्याने पेट्रोल, डिझेल व सीएनजी मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, त्यांना पुरेसा इंधनसाठा मिळावा, याकरिता सर्व पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा व त्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना पंपात पेट्रोल व डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. सणासुदीच्या कालावधीत इंधन तुटवडा असू नये, यासाठी आपल्या स्तरावरून सर्व पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप चालकांच्या संपर्कात राहून करावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सर्व पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपांवर कामकाजाच्या वेळा प्रदर्शित करण्यात याव्यात. आवश्यक तितका स्टाफ उपलब्ध ठेवावा. याचबरोबर सर्व पंपांवर हवा, पाणी, स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करून द्याव्यात. बहुतांशी पर्यटक कुटुंबासह प्रवास करत असल्याने विशेषतः महिला वर्गासाठी योग्य व सुरक्षित स्वच्छतागृहे २४ तास उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. शासकीय वाहने, सेवेतील अत्यावश्यक वाहने, रुग्णवाहिका यांना प्राधान्य देण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी जनरेटर, हँडपंपची व्यवस्था करण्यात यावी. याबाबत जिल्ह्यातील सर्व पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपधारकांना तत्काळ सूचना द्याव्यात, असेही या पत्रामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 25/Aug/2025













