राजापूर : तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत असलेल्या सागवे गावातील ग्रामस्थांना गेल्या चार महिन्यापासून कमी दाबाने व वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठा वीजपुरवठा या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील ग्राहकसंख्या आणि भौगोलीक रचना पाहता वीजेची समस्या तात्काळ दूर करण्यासाठी किमान चार वायरमनची आवश्यकता असताना या ठिकाणी एकाच वायरमनची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात आली आहे याचा फटका विज ग्राहकांना बसत असून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठीकाणी मुख्य वायरमनची नेमणूक करावी अन्यथा, वीज बिले न भरताना तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपच्या सागवे विभागातर्फे देण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून तालुकावासियांना सातत्याने खंडीत होण्यासह कमी-जास्त दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या दूर करण्याची सातत्याने मागणी करून अद्यापही झालेली नसल्याने राजापूरवासिय पुरते त्रस्त झाले आहे. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला असताना वीजेच्या समस्येने राजापूरवासियांची चिंता वाढविली आहे. यामध्ये सागवे गावातील ग्रामस्थ वीजेच्या समस्येने पुरते हैराण झाले आहे. तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सागवे गावातील लोकवस्ती विखुरलेल्या स्थितीमध्ये आहे.
या गावची भौगोलीक रचना आणि घरगुती व्यापारी वीज ग्राहकांची जादा असलेली संख्या पाहता या ठिकाणी तीन ते चार मुख्य वायरमनची आवश्यकता आहे. मात्र, सध्या या ठिकाणी कंत्राटी स्वरुपाचा एकच वायरमन कार्यरत असल्याने वीज ग्राहकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. कमी जास्त होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती व व्यापारी उपकरणांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या साऱ्याची गांभीर्याने दखल घेवून तात्काळ मुख्य वायरमनची नेमणूक करावी अन्यथा, त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपच्या सागवे विभागातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शक्तीकेंद्रप्रमुख मिलिंद देवधर, सतिश कुवेसकर, विनायक कुवेसकर, ईश्वर जाधव, वैभव मेस्त्री, प्रविण पवार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 25/Aug/2025













