रत्नागिरी : वांद्री उक्षी मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात मोटार दरीत कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. २८) दुपारी दोनच्या सुमारास झाला.
ज्ञानेश्वर गुरव (५९) आणि त्यांच्या पत्नी वनिता ज्ञानेश्वर गुरव (५१) हे दाम्पत्य त्यांच्या मोटारीने उक्षीहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. उक्षी घाटात गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी कठड्याला धडकून सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदेश जोशी, पोलिस पाटील अनिल जाधव, तसेच उक्षी गावातील सावंतवाडी, देसाईवाडी आणि गराटेवाडी येथील ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त दाम्पत्याला एका खासगी गाडीतून रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 30-Aug-2025












