Ratnagiri : शासनाच्या 150 दिवस कृती आराखडा सादरीकरणासाठी कोकण विभागीय स्तरावरून रत्नागिरीची निवड

रत्नागिरी : शासनाच्या 150 दिवस कृती आराखडा सादरीकरणासाठी कोकण विभागीय स्तरावरून रत्नागिरीची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांकडून 150 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरण मागविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत गुणांकनाच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांबाबत कार्यवाही करण्यात आली. तयार केलेले सादरीकरण कोकण विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करण्यात आले. यामध्ये कोकण विभाग स्तरावरून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर पाच महसूल विभागातून प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात आली असून एकूण ६ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता व पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्दिष्टाने ६ मे, २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम प्रत्येक प्रशासकीय विभागांनी राबविण्याचे निर्देश आहेत. तसेच सर्व विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करून, नागरिकांना अधिक सुलभ रीतीने सेवा पुरविण्यासाठी 150 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, ई-प्रशासन सुधारणांबाबत राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 30-08-2025