दुबई : Womens T20 World Cup 2024 | अमेलिया केर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ३२ धावांनी मात करताना पहिल्यांदाच आयसीसी महिला टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकारला. अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली.
विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड (३३) आणि तजमीन ब्रिट्स (१७) यांनी ५१ धावांची सलामी देत शानदार सुरुवात करून दिली. फ्रान जोनास हिने ब्रिट्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर केरने वोल्वार्डला बाद करत द. आफ्रिकेची बिनबाद ५१ वरून दोन बाद ५९ अशी अवस्था केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. क्लो ट्रायॉन (१४), एनेरी डर्कसेन (१०) यांनी झुंज दिली, पण शेवटच्या षटकात ३८ धावांचे लक्ष्य द. आफ्रिकेला पेलवले नाही. न्यूझीलंडकडून रोजमेरी मेयर, अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ईडन कार्सन, फ्रान जोनास, ब्रुक हॉलिडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्याआधी, न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लीमर (९) झटपट बाद झाल्यावर सुझी बेट्स (३२) आणि अमेलिया केर (४३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी केली. कर्णधार सोफी डिव्हाईन (६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. तिला डि क्लर्क हिने पायचित केले. अमेलियाने ब्रुक हॉलिडे (३८) हिच्या साथीत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी करत संघाला अठराव्या षटकात १२७ पर्यंत नेले. क्लो ट्रायॉन हिने हॉलिडेला बाद करत ही जोडी फोडली. नॉनकुलुलेको मलाबा हिने अमेलियाला बाद केले. अमेलियाने ३८ चेंडूंत चार चौकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. मॅडी ग्रीन (नाबाद १२) आणि इसाबेला गेझ (३) यांनी संघाला १५८ पर्यंत मजल मारून दिली. द. आफ्रिकेकडून मलाबा हिने दोन, तर खाका, ट्रायॉन, नादिने डि क्लर्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
■ न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १५८ धावा (अमेलिया केर ४३, बुक हॉलिडे ३८)
गोलंदाजी : नॉनकुलुलेको मलाबा २-३१
■ दक्षिण आफ्रिका : २०
षटकांत ९ बाद २२६ धावा (लॉरा वोल्वार्ड ३३, तजमीन ब्रिट्स १७) गोलंदाजी :
अमेलिया केर ३-२४, रोजमेरी मेयर ३-२५.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 21-10-2024