Rajapur Road Railway Station : राजापुरात ‘जनशताब्दी’ला थांबा कधी मिळणार? तालुकावासीयांना प्रतीक्षा…

राजापूर : राजापूर रोड स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेसला अखेर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मिळाला असतानाच समस्त राजापूरवासीयांना अपेक्षित असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसला कोकण रेल्वे प्रशासन राजापूरमध्ये केव्हा थांबा देणार, याची मोठी उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर राजापूर तालुक्यासाठी सौन्दळ स्थानक येथील थांबा वगळता विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुकावासियांसाठी एकमेव असलेल्या राजापूर रोड स्थानकात लांब पल्ल्याच्या आणखी काही एक्स्प्रेसना थांबे मिळणे अपेक्षित असल्याची भावना तालुकावासियांची बनली आहे.

कोकण रेल्वे मार्गांवर राजापूरवासियांसाठी केवळ राजापूर रोड हे एकमेव स्थानक असून विद्यमान क्षणी या स्थानकावर कोकणकन्या, मांडवीसह तुतारी, मडगाव-नागपूर, उधना-मंगलुरू अशा एक्स्प्रेससह सावंतवाडी-दिवा ही पॅसेंजर एक्स्प्रेस गाडी थांबते.

अधूनमधून हंगामी काळात धावणाऱ्या काही गाड्याना राजापुरात थांबे दिले जातात. अलीकडच्या काळात नेत्रावती एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर राजापूर रोड स्थानकात थांबा मिळाला आहे. मागील अनेक वर्षे राजापूरसमधून अनेकांनी नेत्रावतीला राजापूरमध्ये थांबा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते. अखेर त्याला यश आले आणि नेत्रावती राजापूरमध्ये थांबू लागली आहे. नेत्रावतीसमवेत जनशताब्दी एक्स्प्रेसलादेखील थांबा मिळावा अशी राजापूरकरांची अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी अद्याप प्रलंबीत आहे.

याचबरोबर गुजरात, राजस्थानसह दिल्लीकडे जाणाऱ्या आणखी एक, दोन एक्स्प्रेसना राजापूरमध्ये थांबे मिळावेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पण कोकण रेल्वे प्रशासनाने त्याकडे सकारात्मकपणे पाहिलेले नाही. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने यापूर्वी खेड संगमेश्वर स्थानकामध्ये मंगलासह कोच्चुवेली आणि व नेत्रावती एक्स्प्रेसला (संगमेश्वरात) थांबे देवून तेथील जनतेची मागणी पूर्ण केली. त्याचवेळी राजापूर स्थानकात कोरे प्रशासनाने नेत्रावतीला प्रायोगिक तत्वावर थांबा दिला आहे. मात्र जनशताब्दी एक्स्प्रेसबाबत होत असलेल्या मागणीला केराची टोपली दाखवून राजापूरवासीयांवर घोर अन्याय केला आहे.

राजापूरमधून मुंबईकडे दररोज ये जा करणाऱ्यांची संख्या चांगल्यापैकी आहे. मागील काही वर्षे राजापूरमध्ये जनशताब्दीला थांबा मिळावा म्हणून जोरदार प्रयत्न झाले आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने त्याची फारशी दखल घेतलेली नाही. मात्र जनशताब्दीला थांबा दिला जावा अशी मागणी अद्याप थांबलेली नाही. शिवाय गुजरात, राजस्थानसह दिल्लीकडे जाणाऱ्या एक, दोन एक्सप्रेस गाड्यांनादेखील राजापूर रोड स्थानकात थांबे मिळावेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणीदेखील होत असते. पण कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूरसारख्या महत्वपूर्ण आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही.

तालुक्याच्या पूर्व परिसरात सौन्दळ हे हॉल्ट (थांबा) स्थानक आहे. तेथे केवळ दिवा-सावंतवाडी हीच पॅसेंजर वगळता अन्य गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे राजापूर स्थानकात आणखी काही गाड्यांना थांबे देवून कोरे प्रशासनाने राजापूरकरांची गैरसोय करावी अशी जोरदार मागणी आता होत आहे. राजापूर स्थानकात नियमित थांबत असलेल्या गाड्यामध्ये कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मडगाव-नागपूर एक्स्प्रेस, उधना मंगळूरू एक्स्प्रेस, दिवा सावंतवाडी पॅसेंजर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 08/Sep/2025