रत्नागिरी : शहरानजीकच्या मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशीर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवणाऱ्याला अटक करण्यात आली. ही घटना सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत घडली. याप्रकरणी संशयित अमोल अवधुत मयेकर (रा. मयेकरवाडी शिरगाव, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्या विरोधात जखमी पोलीस कर्मचारी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित अमोल मयेकर हा त्याचा चुलत भाऊ समीर शशिकांत मयेकर याला सुरा काढून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या समीरने शहर पोलीस ठाण्यात फोन करून मदत मागितली.
शहर पोलिसांची डायल ११२ ही गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. फिर्यादी पोलिस कर्मचारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने संशयिताला डायल ११२ गाडीत मागे बसवून शहर पोलीस ठाण्यात येत असताना संशयित अमोल मयेकरने त्याच गाडीत मागे ठेवलेले हेल्मेट फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात जोरात मारले. यात त्यांच्या दातांना आणि तोंडाला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. फिर्यादी हे कायदेशीर कर्तव्य करत असताना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी संशयिताने त्याना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला करून दुखापत केली.
तसेच मनाई आदेशादरम्यान सुरा बाळगून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केली म्हणून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 10/Sep/2025












