अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागास १७ सुवर्णांसह ३५ पदके

चिपळूण : कुंडल (जिल्हा सांगली) येथील वनअकादमीत झालेल्या २८व्या अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेत वनविभागाच्या चिपळूण येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत विविध क्रीडाप्रकारांमध्ये १७ सुवर्ण, ११ रौप्य व ७ कास्य अशी एकूण ३५ पदके पटकावत विभागस्तरावरील सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.

अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वनअकादमी कुंडल येथे कोल्हापूर वनवृत्तातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील मिळून सहा वनविभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. स्पर्धेत सर्व विभागाचे सुमारे ३०० स्पर्धक खुला गट, वेटरन, सीनियर वेटरन व महिला गटात सह‌भागी झाले होते. विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी एकेरी कॅरममध्ये सुवर्णपदक, बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक आणि बॅडमिंटन मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवले. साहाय्यक वनरक्षक अंकिता तरडे यांनी कॅरममध्ये रौप्यपदक मिळवले, चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी थाळीफेकमध्ये सुवर्णपदक, एकेरी कॅरम प्रकारात रौप्यपदक, गोळाफेक प्रकारात कास्यपदक मिळवले. दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी सीनियर वेटरन थाळीफेकमध्ये ब्रॉन्झ, गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवले.

परिक्षेत्र वनाधिकारी आर. आर. पाटील यांनी टेबलटेनिस खेळात कास्यपदक आणि रायफल शूटिंगमध्ये रौप्यपदक तर वनपाल जी. एम. पाटील यांनी १०० मीटर धावणे आणि लांब उडीमध्ये सुवर्णपदक मिळवले.

वनरक्षक दत्तराम सुर्वे यांनी गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक, लांब उडीत रौप्यपदक मिळवले. श्रावणी पवार यांनी ८०० मीटर चालणे सुवर्ण तर रिलेमध्ये कास्यपदक मिळवले. किशोर दड्डे यांनी १०० मीटर धावणेत रौप्यपदक, २०० मीटर धावणे कास्यपदक आणि रिले रनिंग कास्यपदक मिळवले. रोहिणी पाटील यांनी धावण्याच्या प्रकारामध्ये पाच सुवर्णपदके मिळवली आहेत. संजय चिमुकले यांनी एकेरी कॅरममध्ये सुवर्णपदक मिळवले.

ऋषिकेश शिंदे यांनी शंभर मीटर धावणेत रौप्यपदक, रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. विशाल पाटील यांनी चारशे मीटर धावण्यात कास्य, रिले रनिंगमध्ये सुवर्ण तर राहुल गुंठे यांनी रिलेमध्ये सुवर्ण, प्रणीत कोळी यांनी सुवर्णपदक मिळवले. अर्जुन जाधव यांनी थाळीफेकमध्ये रौप्यपदक मिळवले. अरूण माळी यांनी बॅडमिंटन एकेरीत रौप्यपदक, मिश्र दुहेरीत सुवर्ण आणि बॅडमिंटन दुहेरीत रौप्यपदक मिळवले. सहयोग कराडे याने बॅडमिंटन दुहेरी प्रकारात रौप्यपदक मिळवले. छाया गोपनेने रिले रनिंगमध्ये कास्यपदक मिळवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 17/Sep/2025