रत्नागिरी : वाहतूक करणाऱ्या 16 चाकी ओव्हरलोड ट्रकने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील उतारात 8 गाड्यांचा चुराडा केला. त्यामध्ये चार कारसह तीन दुचाकी व एका रिक्षाचा समावेश आहे. या भीषण अपघातात झरेवाडी येथील शिवम रवींद्र गोताड वय 19 या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे हे चुराडा झालेल्या कारमधून बालंबाल बचावले. हा अपघात बुधवारी (दि. 17) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास झाला.
निवळी वरून गोवाच्या दिशेने कोळसा वाहतूक करणारा 16 चाकी ट्रक (क्र केए 29 सी 1843) हा हातखंबा गावाहून असलेल्या तीव्र उतारावर चालकाचे ब्रकफेल झाल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरील 8 गाड्यांचा चुराडा करत पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला.
संध्याकाळची वेळ असल्याने नोकरी, आयटीआयमधून घरी परतणारे प्रवासी चारचाकी, दुचाकी, रिक्षातून प्रवास करत होते. अवजड वाहनांच्या गदमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होती. सर्व वाहने लाईनमध्ये सावकाश पुढे जात असताना भरधाव ट्रकने या गाड्यांचा चुराडा केला. सुमारे 200 मीटर कार, दुचाकी फरपटत घेऊन गेला. आयटीआयमधून शिक्षण आटपून दुचाकीवरून शिवम रवींद्र गोताड या विद्यार्थ्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ब्रेकफेल ट्रकने सर्वच वाहनांना मागून धडक दिल्याने सर्व वाहने एकमेकांवर जोरदार आदळली. यामध्ये चारही कारचा पूर्णतः चुराडा झाला. सुदैवाने यातील सर्वजण थोडक्यात बचावले.
रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंत करपे हे आपले शासकीय काम आटपून राजापूर येथे कामानिमित्त जात होते. अचानक त्यांच्या कारवर ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांची गाडी समोरील गाडीवर आदळली यामध्ये पूर्ण कारचा चुराडा झाला. क्षणार्धात एअर बॅग उघडल्यामुळे श्री करपे थोडक्यात बचावले.
या अपघातात डॉ. महेश महाले यांची क्रेटा गाडी, मंगेश नागले यांची रिक्षा, कृष्णदेव भरत येडगे यांची स्प्लेंडर, अविनाश विजय ठाकरे रा. लांजा यांची मोटरसायकल तर लांजा येथील ॲड. समीर दळवी, डॉ. सुदेशकुमार शिवाजीराव चव्हाण यांची कार, संग्राम विलास साळवी रा. नाचणे यांची कार, तर सत्यविनायक सुरेश देसाई यांच्या कारला ट्रकने धडक दिली.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक धुमसकर यांच्यासह हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत झालेल्या शिवम गोताड याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. तर अन्य वाहनचालक, प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
मुंबई – गोवा महामार्गावर यापुव झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच पुन्हा अपघात झला. त्यामुळे हा तीव्र उतार अपघाताचा सापळा बनला आहे. आतापर्यंत येथे चौघांचा बळी गेला आहे.
पुलाचे रखडलेले काम अपघाताला कारणीभूत
मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा गावात पुलाचे काम रखडले आहे. तीव्र उतारावरून गाड्या पुढे जाताना गाडयांचे ब्रक फेल होणे, चालकाचे नियंत्रण सुटणे यामुळे अपघात होत आहेत. पुलाचे काम पूर्ण झाल्यास तीव्र उतार पूर्णतः नष्ट होणार आहे. ठेकेदाराने कामाची गती वाढवून पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. महामार्ग ठेकेदारी अजून किती जणांचे बळी घेणार आहे. असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 18-09-2025












