Swathya Nari, Sashakt Parivar: ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान केवळ 15 दिवसापुरते न राबविता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा निमित्ताने वर्षभर राबवावे. आरोग्य विभागाने सर्व लाभ, सर्व सुविधा या मोहिमेअंतर्गत महिलांना द्यावी, त्याबाबत गावागावातून जनजागृतीही करावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा प्रारंभ सामंत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी आवश्यक असणारा 13 कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडून मंजूर करून आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांनी एकत्रित काम करून आरोग्याच्या सुविधा महिलांना द्याव्यात. कुपोषित बालकांची संख्या शून्य करावी. कुपोषित माता आहेत का, याचाही तपासणी करावी. त्यांनादेखील सशक्त करायला हवे. करोनाच्या काळात आरोग्य विभागाचे काम राज्यांनी पाहिले आहे. अशा महामारीतून महाराष्ट्र बाहेर पडला. कारण पोलीस, आरोग्य विभागाने चांगले काम केले. कॅन्सरपासून स्त्रियांचे संरक्षण करण्याचे काम एचपीव्ही लस करते. जिल्ह्यातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील 50 हजार मुलींसाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. महिलांना, मातांना, मुलींना आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. महिलांनीदेखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. शासकीय रुग्णालयाने परिसर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही पालकमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातील धन्वंतरी मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, नगराध्यक्ष राहुल पंडित, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 18-09-2025