Vanchit Bahujan Aaghadi : खेडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद आंदोलन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारी दि. १६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी मंगळवारी तीव्र घंटानाद आंदोलन छेडले. कोंडिवली येथील शासकीय भूखंडाची मोजणी वारंवार मागणी करूनही होत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. कोंडिवली गावातील शासकीय भूखंडाची तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटवावे व कोकण रेल्वे प्रकल्पात घरे गेलेल्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलक करत आहेत.

आंदोलकांनी सरकारवर उदासीनतेचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करून जनतेला न्याय नाकारल्याचा आरोप केला. कॉडिवली गावातील शासकीय जमिनीवर बेकायदा अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून, याबाबतचे तक्रारी, ठराव आणि बैठका होऊनही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बंचित बहुजन आघाडीने खेड पंचायत समिती समोर जमून घंटानाद आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. या वेळी सरकारी जमीन वाचवा, अतिक्रमण रोखा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे गिरीश गमरे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, ग्रामस्थांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. शासनाने तातडीने मोजणी करून अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. यावेळी त्यांनी कळंबनी गावातील ग्रामसेवकां विरोधात घरकुल प्रकरणात झालेल्या तक्रारीबाबत देखील कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली. आंदोलनात गावातील अनेक नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी आंदोलकांची भेट घेतली. मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयांमध्ये या प्रकरणी पंचायत समिती मार्फत केलेला पत्रव्यवहार तपासून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 18/Sep/2025