Chiplun : खडपोली-वालोटी रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर खडपोली गावासह औद्योगिक वसाहत व दसपटीकडे जाण्यासाठी पेढांबे खडपोली असा वळसा मारून जावे लागत असल्याने अवजड वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच आवश्यक असलेले रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक तसेच सार्वजनिक विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यानुसार पिंपळी नांदिवसे येथील पूल नुकताच खचल्यामुळे पुलावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून जड वाहनांची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सद्यस्थितीत हलकी वाहनांची वाहतूक पिंपळी नाका ते पेढांबे नाका, खडपोली तळेवाडी ते खडपोली, कळंबस्ते ते मोरवणे फाटा, मोरवणे फाटा ते दळवटणे मार्गे वालोटी ते वालोटी फाटा अशी वळविण्यात आली आहे.

दोन्ही पर्यायी मार्ग डांबरी असून त्यांची सरासरी रुंदी केवळ ३.७५ मीटर आहे. तसेच काहीठिकाणी तीव्र वळणे असल्यामुळे या मार्गावरून अवजड वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 18/Sep/2025