Gogate College: गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘समूह गायना’ला मुंबई विद्यापीठात उत्तेजनार्थ पारितोषिक

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या भारतीय समूह गायन कला प्रकाराला मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. देशभक्तीपर आणि लोकगीत अशा दोन गीतांच्या सादरीकरणावर आधारित या स्पर्धेत ३५ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मुंबई बाहेरील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे एकमेव आहे, हे विशेष.

यापूर्वी, जिल्हास्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला होता. अंतिम फेरीमध्येही त्यांनी आपल्या सादरीकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या यशात गीतकार-संगीतकार ओंकार बंडबे आणि काश्मिरा सावंत यांचे मोठे योगदान आहे.

वादक म्हणून अमेय किल्लेकर, शार्दूल मोरे आणि स्वरूप नेने यांनी साथ दिली, तर दीक्षा कामत, दुक्षा कुड, मिथिला नाखरेकर, सेजल तांबे आणि समृद्धी उकिडवे यांनी आपल्या गायनाने कार्यक्रमात रंग भरले.

या विशेष यशाबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर आणि प्राचार्य मकरंद साखळकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 18-09-2025