Food and Drug Administration : नवरात्रौत्सवात अन्न व औषध प्रशासनाचा सर्तकतेचा इशारा

रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर आता भक्तांना नवरात्रीची वेध लागले असून येत्या २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त भक्त उपवास ठेवत असतात. नऊ दिवसात बरी तांदुळ, शाबुदाणा तसेच इतर पदार्थांची मोठी विक्री होत असते. या कालावधीत निकृष्ट दर्जाचा वरी तांदूळ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट दर्जाची वरी तांदूळ शरीरासाठी घातक ठरू शकते. उपवासाचे पदार्थ चांगल्या दर्जाचे मिळावेत म्हणून अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. अन्नाचे नमुने घेण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे.

नवरात्र उत्सव येत्या सोमवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने होणार आहे. नैवेद्यासाठी बाजारात विविध प्रकारची फळे, मिठाईची विक्री होत असते. याकाळात भक्त उपवास ठेवत असतात. उपवास सोडण्यासाठी खिचडी, वरी तांदळाचा भात, फळे खाऊन उपवास सोडत असतात. यामध्ये जास्तीत जास्त वरीचा तांदूळ, व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात तयार करावे व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करावा. पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बँच नंबर इत्यादी बाबी व्यवस्थित तपासून खरेदी करावे.

निकृष्ट दर्जाच्या मिठाईतून नुकतेच गुहागर येथे विषबाधा झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून मिठाईचे नमुने घेण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून ते मिठाई दुकानाची तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आली.

मिठाई दुकानदारावर असणार करडी नजर
नवरात्रीसह आगामी येणाऱ्या दसरा, दिवाळीनिमित्त बाजारात मिठाई खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. मावा मिठाई, खवा, नमकीन पदार्थ, कच्चे अन्नपदार्थाचे नमुने घेवून तपासणी केली जात आहे. निकृष्ट दर्जाची मिठाई असल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

अशी घ्या काळजी..
पॅक बंद असलेली चांगल्या दर्जाचा वरी तांदूळ खरेदी करावा
ओलसर बुरशीजन्य वरी सेवन होणार नाही याची दक्षता घ्यावी
रस्त्यावरील, हातगाडीवरील वरी तांदळाचे पीठ खरेदी करू नये
सकाळी केलेले वरी तांदळाचा भात संध्याकाळी, रात्री खावू नये
वरी तांदळाचे सुटे पीठ खुल्या बाजारातून, हातगाडीवरून घेवू नये
बाजारातून पॅकबंद वरी खरेदी केल्यावर ती स्वच्छ धुवून त्यानंतर घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे
वरी तांदळाच्या पॅकेटवरील तारीख व मुदत पाहून खरेदी करावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 18/Sep/2025