कोल्हापूर येथील विश्वविक्रमी संविधान कार्यक्रमात राजापूर हायस्कुलने केले संस्कृत भाषेतून संविधान गीताचे सादरीकरण

राजापूर : कोल्हापूर दसरा चौक येथे दि. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या विश्वविक्रमी संविधान कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान येथील राजापूर हायस्कूल राजापूर ला प्राप्त झाला. यावेळी राजापूर हायस्कुलच्या विद्यार्थी शिक्षकांनी संस्कृत भाषेतून संविधान सादर केले.

संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून ‘हम भारत के लोग’ अर्थात संविधान गीताचा महा विश्वविक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, हिंदी अशा वीस भाषांतून संविधान प्रास्ताविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले. यावेळी राजापूर हायस्कुलची माजी विद्यार्थीनी राजश्री देवस्थळी, संस्कृत शिक्षिका सौ. शोभा जाधव यांच्या नेतृत्वाखाली ६२ विद्यार्थी, शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राजापूर हायस्कुलच्या चमुने भारताची प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेतून संविधान सादर केले. संस्कृत भाषेतील सादरीकरणाला उपस्थीतांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. सौ. जाधव यांच्यासह पर्यवेक्षिका श्रीमती दर्शना मांडवकर, संगीत शिक्षक उमाशंकर दाते, पंचशिला उजगारे, युवराज माळवी, तृप्ती खैरे, वनिता कुंभार, ग्रंथपाल दिपीका पवार, प्रविण बाणे आदींसह इयत्ता ७ वी ते ११ वीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, समन्वयिका सौ. मानसी हजेरी यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर केले. शासनाचे वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील सहभागी चमुना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले जाणार आहे.

या महा विश्वविक्रमी कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हातून सहभागी होण्याचा बहुमान राजापूर हायस्कुल राजापूर व पटवर्धन हायस्कुल रत्नागिरीला प्राप्त झाला होता. या विश्वविक्रमी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक व नागरिकांतून अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 18-09-2025