Swasth Nari Sashakt Parivar Abhiyan : कळंबणी उपजिल्हा रुग्णायात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खेड : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्ह्यात होत असून महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी तसेच कुटुंबाच्या सशक्त आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या शिबिरात गर्भवती महिलांसाठी विशेष तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर आवश्यक सेवा, कुपोषणावर उपाययोजना, तसेच महिलांना भेडसावणाऱ्या विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याबरोबरच बालकांचे स्वास्थ्य, वृद्धांसाठी सुविधा आणि नागरिकांसाठी असंसर्गजन्य आजार तपासणी या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे २० आणि २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आयुष्मान कार्ड, वयोवंदना कार्ड, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, दंत व नेत्र तपासणी, सोनोग्राफी तसेच कान-नाक-घसा तपासणी यांसारख्या विविध सोयी उपलब्ध राहणार आहेत.

या अभियानामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना मोफत आरोग्य सेवा मिळून त्यांच्या आरोग्याची सविस्तर तपासणी होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 18/Sep/2025