Breaking: रत्नागिरीत अनैतिक व्यापार करणाऱ्या नेपाळी महिलेवर कारवाई, दोन महिलांची सुटका

रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अनैतिक व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका नेपाळी महिलेला अटक केली असून, देहविक्रीच्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी, मिरजोळे येथील एका प्लॉटमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. एका बनावट ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवून खात्री झाल्यावर पोलिसांनी प्लॉट क्रमांक E-69, मिरजोळे एमआयडीसी येथे छापा टाकला.

या छाप्यात एक नेपाळी महिला पुणे येथील दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ तिच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायातून दोन महिलांची सुटका केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती शबनम मुजावर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले आणि इतर पोलीस अंमलदार सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 18-09-2025