Ratnagiri rainfall : रत्नागिरीत संतत’धार’!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार अशा स्वरूपात पाऊस कोसळत असून, गुरुवारी एकूण सरासरी 26.24 मि.मी. पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीपासून गुहागर, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यांत मुसळधार पाऊस पडला, तर इतर काही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू होती.

मागील दीड महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात उकाड्याचे वातावरण होते. रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र, 16 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यानंतर दोन दिवस यलो अलर्ट राहिला. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसाची झोडपाझोड सुरूच राहिली. या पावसामुळे काही भागात भात, नाचणीसह खरीप पिकांना बळ मिळाले असले, तरी काही ठिकाणी पिकांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फळबागांवरही हलका परिणाम होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील काही दिवस जिल्ह्यात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह मुसळधार परतीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार चाहूल लागली आहे. गुरुवारी दिवसभर संततधार कोसळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकर्‍यांची पिके धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 19-09-2025