Chiplun : केसरी, मराठाचे दुर्मीळ अंक ‘लोटिस्मा’च्या संग्रहालयात!

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीसह महत्त्वाचे दुर्मीळ अंक भेटस्वरूपात दाखल झाले आहेत. दैनिक केसरीचे माजी सहसंपादक वासुदेव कुलकर्णी यांनी हे अंक वाचनालयाला भेट दिले आहेत.

दैनिक केसरीचा पहिला अंक ४ जानेवारी १८८१ रोजी प्रकाशित झाला होता. विशेष म्हणजे या अंकाचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. इंग्रज सरकारला धडकी भरवणाऱ्या या दैनिक केसरीचे पुढे लोकमान्य टिळक संपादक झाले होते. मराठी नियतकालिकात महत्त्वाचा अंक म्हणजे मनोरंजन मासिकाचा दिवाळी अंक होय.

महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीत रसिक वाचक विविध दिवाळी अंकांच्या प्रतीक्षेत असतात. मराठी साहित्यविश्वात दिवाळी विशेषांकाची परंपरा मनोरंजन मासिकाने सुरू केली. १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक मनोरंजनाने प्रकाशित केला होता.

मनोरंजन दिवाळी अंकासह वैचारिक साहित्यात अग्रेसर असलेल्या माणूस मासिकाचा जून १९६१चा पहिला अंक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शासनाला सळो की पळो करून सोडणाऱ्या आचार्य अत्रे यांनी सुरू केलेला दैनिक मराठाचा १५ नोव्हेंबर १९५६चा पहिला अंक, समतानंद अनंत हरी गद्रे यांच्या संपादनाने प्रसिद्ध झालेला मौज मासिकाचा अंक आता वाचनालयाच्या संग्रहालयात पाहायला मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 20/Sep/2025