मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी ‘सी-व्हिजिल एप’ विकसित केलं आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.
या एपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवलं जाणार आहे.
प्रशासन आता दिवसेंदिवस डिजिटल होत चाललं आहे. त्यामुळे निवडणूक काळात आचारसंहितेचं कोणाकडून उल्लंघन होत असेल तर बसल्या जागी तक्रारी करता येणार आहेत. एरव्ही आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक आयोगाकडून उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. तरीदेखील आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्यामुळे असे झाले तर त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल एप विकसित केले आहे.
अशी करा तक्रार…
उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त एप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक आहे.
भरारी पथक करेल कारवाई
– नागरिक या एप्लिकेशनचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांत पैसेवाटप किवा अन्य चुकीच्या कामांची, घटनांची तक्रार नोंदवू शकतात.
– हे सी-व्हिजिल एप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 22-10-2024