Guhagar : विषारी साप चावल्याने विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

गुहागर : शेजारच्या घरी चालत जात असताना विषारी साप चावल्याने गुहागर तालुक्यातील पेवे – आमशेत, भोईवाडी येथील विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नम्रता संदेश निवाते (वय ३४) असे विवाहितेचे नाव आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

याबाबत पती संदेश हरिश्चंद्र निवात यांनी गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नम्रता निवाते या २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान घराशेजारी असणाऱ्या एका घरी चालत जात होत्या. त्यावेळी कोणत्या तरी विषारी सापाने त्यांना दंश केला. हा प्रकार त्यांनी तातडीने संदेश निवात यांना सांगितला.

त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांना तळवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी दाखल केले होते. तिथून गुहागर सरकारी रुग्णालयात व नंतर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावर्डे पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली होती. तिथून हा गुन्हा गुहागर पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला. त्यानुसार २९ रोजी गुहागर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 01/Oct/2025