चिपळूण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीतर्फे संघातील यशस्वी, कणखर नेतृत्व असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे कार्य हे रांगोळी प्रदर्शनातून दाखवण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी (दसरा) सायंकाळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरमध्ये हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा सरसंघचालकांची व्यक्तिचित्रे आहेत. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंह, के. सी. सुदर्शन आणि विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अशा व्यक्तिमत्त्वांच्या आणि त्यांच्या कारकिर्दीत घडून आलेल्या प्रमुख घटना आणि सेवाकार्य रांगोळीतून साकारण्यात येणार आहे.
ही सर्व संकल्पना संतोष केतकर यांची आहे. गोव्याचे प्रसिद्ध रांगोळी कलाकार विकास पडते, भूमेश नाईक, दर्शन नाईक हेसुद्धा संतोष केतकरांसोबत रांगोळी साकारणार आहेत. हेडगेवारांचे चित्र वाळूशिल्प प्रकारातील असून ते संतोष केतकर साकारत आहेत. नागरिक, कलाकार, रसिकांना ही कला पर्वणीच असणार आहे. हे रंगावली प्रदर्शन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण येथे आहे.
दसरा हा संघाचा स्थापना दिवस म्हणून दसऱ्याला या रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी ५ वा. होईल. यानंतर २ ते ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 02/Oct/2025














