Ratnagiri : काजू प्रक्रिया उद्योगाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी

रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगाविषयी काढलेल्या १६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी मागणी विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

काजू प्रक्रिया क्लस्टर उद्योजक जयवंत तथा दादा विचारे यांनी कोकणातील प्रक्रिया उद्योग स्थिरस्थावर व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. १६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्याचा फायदा संबंधितापर्यंत पोहोचलेला नाही. काजू प्रक्रिया उद्योग व काजू ग्राहकांना दिलासा देण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कृषिमंत्र्यांनी आदेश द्यावेत, अशी विनंती विचारे यांनी आमदार दरेकर यांना केली होती. कोकणातील काजू व्यवसायिकांचा महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे दरेकर यांनी तत्काळ कृषिमंत्री श्री. भरणे यांच्याकडे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी, अशी मागणी केली आहे.

कोकणातील काजू फळ पिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन महाराष्ट्रातील काजूच्या सर्वंकष विकासाचे एक निश्चित धोरण तयार करण्यासाठी १८ जुलै २०१८ ला काजू फळपीक विकास समिती गठीत केली होती. या समितीने लागवड विषयक धोरणात्मक शिफारशी, उत्पादन वाढ विषयक धोरणात्मक शिफारशी, प्रक्रिया उद्योग उभारणी विषयक धोरणात्मक शिफारशी, चालू असणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना सहाय्यक विषयक धोरणात्मक शिफारशी, अशाप्रकारे चार प्रकारच्या धोरणात्मक शिफारशीचा समावेश असलेला अहवाल सादर केला होता.

या अहवालाच्या आधारे कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने महाराष्ट्रातील काजूच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबतच्या प्रस्तावाला १३ डिसेंबर २०२२ ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली व त्याबाबतचा शासन निर्णय १६ फेब्रुवारी २०२३ ला निर्गमित केला होता, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती. आमदार दरेकर यांनी कृषि मंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काजू प्रक्रिया उद्योजकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 06/Oct/2025