Chiplun : पाणंद रस्त्यांचा तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना लाभ

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यात राबवलेल्या सेवा पंधरवड्यात ६ हजार २७९ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील गावनमुना नं. २३ वर ४ हजार ६७२ रस्त्यांची नोंद झाली. या रस्त्यांचा ३८ हजार ४१२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सेवा पंधरवड्यात ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग, शेत पाणंद रस्त्याचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे, रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. नोंद असलेल्या सत्यांपैकी ३७ रस्त्यांचे भूमिअभिलेख विभागाकडून सीमांकन करण्यात आले आहे. सेवा पंधरवड्यात प्रामुख्याने लोकांच्या वापरात असलेले परंतु नोंद नसलेले अनेक रस्ते नकाशावर आले आहेत. याचा ग्रामस्थांना मोठा लाभ झाला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत १० दिव्यांग व वयोवृद्धांना घरपोच धान्य दिले. ४ लाभार्थ्याना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा मंजूर झाला. या अभियानाची कामथे, कापसाळ, मिरजोळी व चिपळूण शहरात डिजिटल व्हॅनद्वारे प्रचार व प्रसिद्धी केली. यामध्ये ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली तसेच अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करणे व तालुकास्तरावर प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल लोकअदालत घेण्यात आली. त्यामध्ये ८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. संजय गांधी, श्रावणबाळ व राष्ट्रीय कुटुंब योजनेमधून ९४ कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ मंजूर करण्यात आला.

विविध दाखल्यांचे वितरण
प्रशासनामार्फत कातकरी समाज निरवाडे, आकले, कुटरे, शिरगाव येथे शिबिरांचे आयोजन करत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ३३८ उत्पन्नाचे दाखले, ६ शिधापत्रिका, २४२ सातबारा, १७३ आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती, वारसतपास ४४, फेरफार निकाली ५५, आयुष्मान भारतकार्ड ५५, विविध प्रकारचे दाखले १९२, अर्ज स्वीकारणे ६६ असे विविध प्रकारचे लाभ ग्रामस्थांना देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 08/Oct/2025