गिरणी कामगारांसाठी रिक्त जागेवर त्वरित घरे बांधा : गोविंदराव मोहिते

चिपळूण : मुंबईतील रिक्त जमिनीवर राज्य सरकारने गिरणी कामगारांसाठी त्वरित घरे बांधावीत, अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढेल, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस व कुंभार्ली (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला आहे.

गिरणी कामगारांच्या घरांच्या अनिर्णित प्रश्नावर श्री. मोहिते म्हणाले की, वरळी येथील सेंचुरी मिलची लीज संपल्यानंतर सहा एकर जमीन मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे. ती जमीन गिरणी कामगारांनाच घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. ती जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी न देता अन्य विकासकांना विकास करण्यासाठी देण्यात आली, तर कामगारांवर अन्याय होईल.

एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील घराबाबत गोविंदराव मोहिते म्हणाले, केंद्र सरकारने एनटीसीच्या १४ गिरण्या अद्यापही बंद ठेवल्या आहेत. त्या जमिनी अन्य विकासकाला देण्यात आल्या, तर गिरणी कामगारांना घरे मिळणे दुरापास्त होऊन बसेल. सरकारने या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला, तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणे शक्य होईल, अशी ठोस भूमिका मोहिते यांनी यावेळी मांडली.

पुन्हा उग्र आंदोलन उभारावे लागेल
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेचा प्रयत्न सुरू आहे. घरांसाठी आजपर्यंत आक्रमक व ठोस भूमिका घेत आंदोलने करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही शासनाने गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस भूमिका जाहीर नाही. त्यामुळे आता पुन्हा उग्र आंदोलन उभे करून सरकारला जाब विचारावा लागेल, असा इशारा कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Oct/2025