लांजा : मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहराची स्वच्छ सुंदर लांजा शहर ही संकल्पना आगामी काळात अधिक प्रभावीपणे राबवून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची माहिती लांजा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच ही संकल्पना राबवित असताना दर महिन्यातील प्रत्येक बुधवारी मुख्याधिकारी म्हणून आपण स्वतः त्याचप्रमाणे नगरपंचायतीचे सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचारी त्याप्रमाणे कंत्राटी कर्मचारी, सफाई कर्मचारी असे एकूण ७० जण स्वत या मोहिमेत सहभागी होऊन ही स्वच्छतेची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी शहराच्या स्वच्छतेची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहराला स्वच्छ सुंदर शहर म्हणून नावारूपाला आणावयाचे आहे. यासाठी केवळ सफाई कर्मचारीच नव्हे तर शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकांनी देखील आपला सहभाग देणे महत्त्वाचे आहे.
सध्या लांजा शहराच्या विविध भागात साठणारा कचरा हा नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी उचलला जात आहे कचऱ्यामुळे शहराला विद्रुपपणा येतो. हे टाळण्यासाठीच स्वच्छ सुंदर लांजा शहर ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविणार आहोत. दर मंगळवारी लांजा शहरात तालुक्याचा आठवडी बाजार भरतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्ग तसेच परिसरात भाज्या व अन्य कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. सफाई कर्मचाऱ्यांकडून हा कचरा उचलण्यासाठी नेहमीच सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात.
यापुढे महिन्यातील एका बुधवारी आपण स्वतः मुख्याधिकारी त्याचप्रमाणे सर्व संवर्ग कर्मचारी यामध्ये नगरपंचायतीचे लिपिक, कंत्राटी कर्मचारी, शिपाई, सफाई कर्मचारी असे ७० जण स्वतःहून या स्वच्छता मोहिमेत उतरणार आहोत. शहरातील साठणारा सर्व प्रकारचा कचरा हा स्वच्छ करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांसोबत या स्वच्छता मोहिमेत उतरणार आहोत. तू भविष्यात या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग देखील वाढून लांजा शहर नेहमीच स्वच्छ सुंदर दिसेल, असे मुख्याधिकारी अभिजित कुंभार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 11/Oct/2025














