Diwali Festival : आजपासून दिवाळी सणाला प्रारंभ…

रत्नागिरी : दिवाळी सण अवघ्या दोनच दिवसांवर येऊन ठेपला असून रत्नागिरीकरांकडून जोरदार खरेदी सुरू आहे. दरम्यान, यंदा चार दिवसांची दिवाळी असून १७ ऑगस्टपासून वसूबारसने दिवाळी सुरू होईल ते २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज असणार आहे.

वसुबारस १७ रोजी
या दिवशी सौभाग्यवती महिला एकवेळ जेवण करून सायंकाळी वासरासह असलेल्या गायीचे सूर्यास्तानंतर पूजन करतात. यादिवशी गायीची अथवा गाय वासराच्या मूर्तीची, गायीच्या चित्राची पूजा करतात.

धनत्रयोदशी १८ रोजी
यादिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी यादिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. अकाली मृत्यू होऊ नये यासाठी सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा.

नरक चतुर्दशी २० रोजी
नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध अश्विन कृष्ण चतुर्दशीला स्त्रियांची मुक्तता केली. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे, हे महत्त्वाचे मानले जाते.

लक्ष्मीपूजन २१ रोजी
व्यापारी वर्गासाठी अश्विनातील अमावस्या शुभ आहे. पुराणातील आश्विन अमावस्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

दिवाळी पाडवा २२ रोजी
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा केली जाते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यादिवशी पत्नीने पतीला ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते.

भाऊबीज २३ रोजी
यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. यादिवशी बहिणीने भावास जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.

लक्ष्मीपूजन मुहूर्त
मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ४.३०, सायंकाळी ६ ते रात्री ८.३०, रात्री १०.३० ते १२
वहीपूजन मुहूर्त
बुधवारी पहाटे ३ ते ६, सकाळी ६.३० ते ९.३०, सकाळी ११ ते दुपारी १२.३०

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 17/Oct/2025