राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्र. ६ च्या जारी करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीला भाजपा शहर अध्यक्ष किरण शिवलकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्रारूप मतदार यादी तयार करताना प्रभागाची लोकसंख्या १०४० नमुद करण्यात आलेली असताना प्रत्यक्ष मतदार यादीत मतदार संख्या १०६० दाखविण्यात आली आहे. एकंदरीत प्रभाग रचनेची लोकसंख्या आणि प्रभाग रचनेनुसार मतदारांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत प्रशासनाच्या कामकाजाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
ही अतिरिक्त मतदार संख्या कमी करण्यात यावी अशी मागणी श्री. शिवलकर यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद राजापूर यांना देण्यात आले आहे. राजापूर नगरपरिषद प्रशासनाने दि. १८/०८/२०२५ रोजी राजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ संदर्भात प्रभाग रचना सहीत त्या प्रभागातील लोकसंख्या जाहीर केली. त्यावेळी प्रभाग क्र.६ मध्ये १०४० ही लोकसंख्या आपण प्रसिध्द केलीत त्यानंतर आपल्याकडे मी वरील प्रभागासंदर्भात दि. ३१/०८/२०२५ रोजी लेखी हरकत घेतली होती. आपल्या माध्यमातून सदर हरकत फेटाळण्यात आली व तो प्रभाग लोकसंख्येसहीत निश्चित करण्यात येवुन प्रसिध्द करण्यात आला.
प्रारुप मतदार यादी दि.०८/१०/२०२५ रोजी प्रसिद्ध केली त्यामध्ये प्रत्यक्ष मतदार संख्या ही आपण १०६० दर्शविली आहे. एकंदरीत प्रभाग रचनेची लोकसंख्या आणि प्रभाग रचनेनुसार मतदारांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे. नगरपरिषद प्रशासनाने हेतुपुरस्सर या प्रभागामध्ये बदल केलेले जाणवत आहेत. जर लोकसंख्या १०४० असेल तर प्रत्यक्ष मतदार संख्या १०६० कशी? याबाबत संशय निर्माण होत आहे. आपल्या प्रशासनाने कोणाची तरी मर्जी राखणेकरिता किंबहुना कोणाच्यातरी दबावाखाली स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला दिसुन येत आहे.
प्रत्यक्षरित्या बीएलओ यांची नेमणुक करुन बीएलए यांना समवेत घेवुन संपूर्ण प्रभागाचे घराघरामध्ये जाऊन मतदार ओळखपत्र, मतदान ओळखपत्र क्रमांक आणि पत्ता याची शहानिशा करून अतिरिक्त झालेली मतदार संख्या कमी करण्यात यावी. याची कारवाई न झाल्यास प्रभाग क्रमांक ६ मध्ये पवित्र मतदानाच्या प्रक्रियेचा त्या प्रभागातील मतदार बहिष्कार घालण्याचा ईशारा दिला आहे. याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष श्री महेश मंणचेकर, माजी शहर अध्यक्ष तसेंच माजी युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष नागेश शेट्ये, माजी युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश खानविलकर, शहर सरचिटणीस जितेंद्र करंगुटकर, बूथ अध्यक्ष सुशील टिळेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 16/Oct/2025













