राजापूर : शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत असताना शहराचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर चौकातील नन्हेसाहेब पुलाचे पालटणारे रूप मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माजी आमदार अॅड हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या विशेष प्रयत्नाने या पुलाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून लवकरच या नन्हेसाहेब पुलाला नवा साज चढणार आहे. त्यामुळे राजापूर शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
शहरातील जवाहर चौक व त्याला लागून असलेला कोदवली नदीवरील नन्हेसाहेब पूल आहे. नन्हेसाहेब पूल हा ब्रिटीशकालीन असून आजही भक्कमपणे उभा आहे. या पुलामुळे शहराचे दोन भाग जोडले गेले असल्याने या पुलाला विशेष महत्त्व आहे.
या पुलावर रिक्षा स्टैंड आहे, तसेच सायंकाळी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणूनही या पुलाला विशेष पसंती आहे. त्यामुळे या पुलाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून शहरवासीयांतून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी या पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी मिळवून दिला असून सद्यस्थितीत सुशोभिकरणाचे काम अंतीम टप्प्यात आहे. या ऐतिहासीक पुलाला आकर्षक अशा रेलींग बनविण्यात आल्या असून बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय आकर्षक अशा पध्दतीने लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून या पुलाचा उपयोग शहरवासीयांना होणार आहे. सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलाला नवा साज चढणार असून राजापुरवासीयांसाठी तालुका तसेच तालुक्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठीही हा पुल आकर्षण ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 18/Oct/2025













