Ratnagiri : समुद्रात बुडणार्‍या 3 महिलांना वाचविले; गणपतीपुळे येथील घटना

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बुडणार्‍या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांना यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या ठिकाणाहून निशा अजय सांगळे (वय 30), हर्षदा प्रमोद मिटले (30), तसेच तनुजा रमेश आभाळे (17) या तिघीजणी आपल्या कुटुंबासह शुक्रवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी त्या समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना समुद्री लाटांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनार्‍यावर असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी आपल्या स्पीड बोटीच्या सहाय्याने तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेत पाण्याबाहेर काढले. त्यामुळे तिघींनाही वाचविण्यात

वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांना यश आले. यावेळी त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे चौकीच्या पोलीस कर्मचार्‍यांची मोलाची मदत प्राप्त झाली. दुर्घटनाग्रस्त तिन्ही महिलांना सुरक्षितरित्या समुद्राच्या पाण्याबाहेर काढल्यानंतर जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि गणपतीपुळे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या अ‍ॅम्बुलन्सने नेले. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. ही कामगिरी केल्याबद्दल गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावरील वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांचे विशेष अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 18-10-2025