Ratnagiri : समुद्रकिनारी महिलांना त्रास दिल्यास होणार कठोर कारवाई

पावस : समुद्रावर असणाऱ्या महिलांना कोणी त्रास दिला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. समुद्रावर कोणी अतिउत्साही व्यक्ती आढळली, तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना तत्काळ कळवावे, अतिउत्साही पर्यटकांनी समुद्रांवर जाताना संयम बाळगावा, असे आवाहन पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी समुद्रकिनारी भागातील नागरिकांसह पर्यटकांना केले आहे.

दिवाळीच्या सुट्या आता सुरू झाल्या असून, कोकणात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच नागरिकांना त्यांनी आवाहन केले. या परिसरातील गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, वायंगणी आदी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसपाटील सागर सुरक्षा दल यांच्यासमवेत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी समुद्रावर जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही खोल समुद्रात जाऊ नये आणि स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. मद्यपान करून समुद्रावर गाडी चालवू नये आणि अतिउत्साही पर्यटकांनी समुद्रांवर जाताना विशेष काळजी घ्यावी, तसेच तिथे असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, महिलांनी विशेष काळजी घेऊनच समुद्रात जावे, अशा सूचना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी दिल्या.

घाटमाथावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे विशेष आकर्षण असते. पाण्यात उतरल्यानंतर भान न राहिल्याने बऱ्याच दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे विक्रम सिंग पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 20-Oct-25