चिपळूण : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या एसटी स्टॅन्ड येथील प्रवाशांची होणारी गैरसोय तसेच महामंडळाच्या आवारात फेरीवाले व खाजगी वाहनांची होणारी पार्किंग यामुळे चिपळूण आगारातून येणाऱ्या एस.टी. बसेस जुन्या स्टॅण्डला आत न लावता बाहेर रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत असे. ही बाब कोकण प्रवासी महासंघाने आगारप्रमुखांच्या निदर्शनात आणून देत सातत्याने पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम केली. त्यामुळे कोकण प्रवासी महासंघाने धन्यवाद पत्र दिले आहे.
या पत्रात असे नमूद केले आहे की, मध्यवर्ती आगार अंतर्गत चिपळूण बाजारपेठेत असलेल्या जुना एस.टी. स्टँड येथे प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाचे आणि एसटी अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण होत आहे.याबाबत गेली तीन वर्षापासून प्रत्यक्ष भेटीत व पत्राद्वारे संबंधित विभाग व मुंबई मध्यवर्ती कार्यालय यांना प्रवाशांना होणाऱ्या अनेक अडचणीला सामोरे जावे लागत लक्ष वेधले. अखेर कोकण प्रवासी महासंघाच्या प्रयत्नाला यश आले. महामंडळ खडबडून जागे होऊन अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. तसेच परत अतिक्रमण होऊ नये याकरिता एसटी वाहतूक अधिकारी येथे जातीने पहारा देत आहेत. महामंडळ याने केलेल्या कार्यवाहीबद्दल लाखो प्रवाशांच्या वतीने अभिनंदन करत धन्यवाद देण्यात आले.
तसेच आवारात असलेली सदर इमारतीची अवस्था दयनीय आहे. प्रवाशाना बसण्यास योग्य जागा नाही. प्रवासी इमारतीत न बसता शेजारी असलेल्या स्टॉलच्या पायरीवर बसत आहे. घाणीचे साम्राज्य असून इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याकडेसुद्धा जातिनिशी लक्ष देण्यात यावे असेही या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर संस्थापक वसंत भोसले, अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष दीपक शीरकर, कार्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, खजिनदार अविनाश चव्हाण, चिपळूण संपर्कप्रमुख दिलीप चव्हाण, गुहागर संपर्क दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी, सत्यवान महापुस्कर यांनी स्वाक्षरी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 23-Oct-25













