रत्नागिरी : हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय स्तरीय निमंत्रित जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या साडेचार वर्षीय चिमुकल्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रत्नागिरीच्या एस. एम. स्विमिंग कोचिंग इन्स्टिट्यूटचा जलतरणपटू कु. परम दिनकर सावंत याने (जी.जी.पी.एस. हायस्कूल) तिन्ही इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवत ३ सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.
या चमकदार कामगिरीमुळे, राज्याबाहेर सर्वात लहान गटामध्ये (५ वर्षांखालील) खेळून सुवर्णपदक पटकावणारा कु. परम हा रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे.
ब्ल्यू व्हेवज स्विम अँकॅडमी, हैदराबाद यांनी दिनांक १८ व १९ ऑक्टोबर रोजी ‘ब्ल्यू व्हेवज ॲक्वेटिक चॅम्पियनशिप २०२५’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेत ५, ७, ९, ११, १३, १५ व १७ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण ७ वयोगटांमध्ये सामने खेळवण्यात आले.
परमची सुवर्ण-त्रयी आणि ‘फ्युचर ऑलिंपियन’ किताब
जी.जी.पी.एस. हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या कु. परम दिनकर सावंत याने ५ वर्षांखालील गटात भाग घेतला होता. त्याने २५ मीटर किक बोर्ड, २५ मीटर फ्री स्टाईल आणि ५० मीटर फ्री स्टाईल अशा तिन्ही क्रीडा प्रकारात कडवी झुंज देत ३ सुवर्ण पदके पटकावली. या तिहेरी यशासोबतच त्याला ५ वर्षांखालील गटाचा चषक आणि “फ्युचर ऑलिंपियन” (Future Olympian) हे मानाचे टायटलही बहाल करण्यात आले.
विशेष म्हणजे, आजपर्यंत अवघ्या ४ विविध स्पर्धांमधून परमने एकूण ७ सुवर्णपदके पटकावण्याची किमया केली आहे.
यशस्वी वाटचालीचे श्रेय
छोट्या परमचे हे यश त्याचा जेष्ठ बंधू रोहन सावंत याच्या जलतरण प्रेरणेतून प्रेरित असल्याचे त्याचे प्रशिक्षक श्री. संजय बेडगे व सौ. मनिषा बेडगे अभिमानाने सांगतात. या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक, वडील दिनकर सावंत, आई सोनल सावंत, वडिलबंधू विशाल सावंत, बहीण अंकुर सावंत आणि संपूर्ण सावंत परिवाराला जाते.
दिमाखदार पारितोषिक सोहळा
हैदराबाद येथे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, राजस्थान अशा विविध राज्यांमधून बहुसंख्येने जलतरणपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस रु. ११००/-, द्वितीय रु. १०००/-, व तृतीय रु. ९००/- रोख रक्कम, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक समारंभ एडव्हेंसवा इंटरप्रायजेस प्रा. ली. चे चेअरमन व एम. डी. श्री. श्रीनिवासा श्रीकांत उप्पुलुरी, माजी वायुसेना प्रमुख व ब्ल्यू व्हेवज स्विम अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. विजयसिंग आणि ब्लू डॉल्फीन स्विम क्लबचे वरिष्ठ मुख्य प्रशिक्षक श्री. दिनेश राजोरिया यांच्या शुभहस्ते पार पडला.














