Chiplun : एसटीतून पडलेल्या ‘त्या’ प्रवासी महिलेचा मृत्यू

चिपळूण : गुहागर ते गणेशखिंड मार्गे रत्नागिरी जाणाऱ्या बसचा आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रियंका विनोद कुंभार (३५, दहिवली-रा. कुंभारवाडी) यांचे २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. अपघातानंतर चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रियंका यांनी गेले तीन दिवस जीवन मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

गुहागर ते रत्नागिरी या मार्गावरील एस.टी. बसमधून प्रियंका कुंभार आणि त्यांच्यासोबत सविता करंजेकर या १९ ऑक्टोबर रोजी दहिवली खुर्द येथील आंबाफाटा थांब्यावरून सावर्डे येथे प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बस खड्ड्यात आदळल्यामुळे बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला. यामुळे प्रियंका कुंभार या दरवाजातून थेट बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच इतर भागांवर गंभीर दुखापत झाली.

त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी यापूर्वीच सावर्डे पोलिस ठाण्यात बसचा चालक आणि वाहकांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहिवलीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. एसटी प्रवासादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 27/Oct/2025