Chiplun : चिपळुणात कमी दाबाने अस्वच्छ पाणीपुरवठा;भाजपने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : चिपळूण शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शहर मंडळाचे अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “चिपळूण शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे तसेच पुरवठ्याची निश्चित वेळ नसल्याने महिलांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पाण्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून ते अस्वच्छ येत आहे.

भाजप शहर मंडळाने नगरपरिषदेचे लक्ष वेधून दिले की, जर या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले तर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ मंत्री महोदयांकडे याबाबत तक्रार दाखल केली जाईल. मोदी यांनी स्पष्ट केले की, “महायुतीची सत्ता असताना जनतेला जाणीवपूर्वक त्रास होऊ नये, हिच आमची अपेक्षा आहे. नगर परिषदेला पाणीपुरवठा सुधारण्यासाठी काही सहकार्य हवे असल्यास महायुतीकडून ते करण्यास आम्ही तयार आहोत.” या निवेदनामुळे चिपळूण नगर परिषद प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुधारण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. नागरिक मात्र “स्वच्छ आणि वेळेवर पाणी मिळावे” अशीच अपेक्षा व्यक्त करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 27/Oct/2025