Khed : खेड-खोपी रस्त्याची दयनीय अवस्था

खेड : तालुक्यातील खेड-खोपी हा प्रमुख जिल्हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्णावस्थेत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. सुमारे १४ किलोमीटर लांबीच्या या मार्गाची स्थिती इतकी वाईट झाली आहे की मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

या रस्त्यावरून दररोज शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. रस्ता इतका उखडला आहे की पावसाळ्यानंतर तो चिखलमय झाला असून, वाहनचालकांना घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

खोपी ते कुदुंबे या दरम्यानच्या मार्गावरून वाहतूक करणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली, मात्र आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. ग्रामस्थांनी सांगितले की, रस्ता दुरुस्त न झाल्याने शेतमाल वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रुग्णवाहिकेलाही वेळेवर पोहचण्यात अडचणी येत आहेत.

स्थानिक ग्रामस्थ तसेच समाजसेवी संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधून तातडीने खेड खोपी रस्त्याची दुरुस्ती करून नव्या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या अडचणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 28/Oct/2025