रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) स्वबळावर लढण्यास सज्ज असून, रत्नागिरी पालिकेच्या एकूण ३२ जागांसाठी ४० इच्छुक उमेदवारांनी अर्ज शहराध्यक्षांकडे दिले आहेत. तसेच महिला नगराध्यक्षपदासाठी दोन महिलांनी इच्छा व्यक्त केली आहे.
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक शनिवारी (ता. २५) विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांच्या संपर्क कार्यालयात झाली. यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तरीही वेळ पडल्यास वेगळे लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या बैठकीत प्रदेश सचिव बशीर मूर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, युवक अध्यक्ष नौशीन काझी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक सईद पावसकर, माजी नगरसेवक बबन आंबेकर, जिल्हा सरचिटणीस रणजित शिर्के, कल्पना भिसे, फर्जना मस्तान, नजीर वाडकर, सनीफ गव्हाणकर, पंकज पुसाळकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 28/Oct/2025












