Ratnagiri : श्री लक्ष्मीकांत मंदिरात १५६ वर्षांचा कार्तिकोत्सव

रत्नागिरी : तालुक्यातील केळ्ये गावातील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात कार्तिकोत्सवानिमित्त काकडा आरती गेली १५६ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. आजही या उत्सवाचे स्वरूप म्हणजे महिनाभर दररोज पहाटे ४.४५ ते सकाळी ६ पर्यंत काकडा आरती मनोभावे करण्यात येते. या आरतीला दररोज सरासरी २५ ते ३५ जण उपस्थित असतात. हा उत्सव एक महिन्याचा असल्याने तो साजरा करणे म्हणजे शिवधनुष्य; परंतु एकादशी मंडळाने या उत्सवाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

रत्नागिरी शहरापासून ११ किलोमीटवर केळ्ये गाव आहे. गावात श्री लक्ष्मीकांत, श्री विश्वेश्वर, श्री गणपती पंचायतन, श्री राधाकृष्ण व ग्रामदेवता अशी पुरातन मंदिरे आहेत, श्री लक्ष्मीकांत देवळाची स्थापना नेने यांनी सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वी केली. त्यांना श्रीविष्णु, श्री लक्ष्मीकांत या देवाची मूर्ती सागरात जाळ्यात सापडली, ती त्यांनी घरी आणली ते ठिकाण म्हणजे नेनेवठार, येथे असलेले
त्यांचे घर. नंतर त्यांनी देवाची प्रतिष्ठापना करून घुमटी बांधली. ग्रामस्थांनी त्याची वेळोवेळी सुधारणा केली, जीर्णोद्धार केला.

श्री लक्ष्मीकांत मंदिरात कार्तिकोत्सव, गोकुळाष्टमी, नामसप्ताह असे उत्सव करण्यात येतात. हे देऊळ सार्वजनिक आहे; परंतु याची देखभाल, दुरुस्ती, पूजाअर्चा एकादशी मंडळाकडून करण्यात येते. लिखित माहितीनुसार, १९६९ ला मंदिराचा शताब्दी उत्सव साजरा केला. त्या वेळचे एकादशी मंडळाचे अध्यक्ष जनार्दन धोंडदेव गोखले (वय ७०) व अन्य ज्येष्ठ मंडळी यांनी कालगणनेबाबत चर्चा केली. अध्यक्षांचे वडील धोंडदेव गोखले हे त्यांच्या वडिलांपासून हा उत्सव चालू आहे, असे सांगत. त्यामुळे १९६९ ला या उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली, असे समजून शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. त्यानंतर १९९४ मध्ये १२५ वर्षे, २०१९ मध्ये १५० वर्षांचा उत्सव साजरा करण्यात आला. आता १५६वे वर्ष सुरू आहे. एकादशी मंडळाची स्थापना केव्हा झाली, याची लिखित माहिती नाही; पण पूर्वीच्या काळात सर्व शेतकरी शेतीची कामे बंद ठेवत व एकादशीला देवळात जमून बैठक घेत. आता दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी बैठक घेऊन निर्णय घेतले जातात.

१८७४ची सनद
देवळासमोर असलेल्या घराघरांत असलेली घंटा ही शके १७११ मध्ये कासाराने ओतली होती, असा उल्लेख त्या ११७ किलो वजनाच्या घंटेवर होता. तसेच त्या घंटेचासुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या देवळास ११ रुपयांची १८७४ची सनदसुद्धा होती. या देवळाचा सद्यःस्थितीतील जीणोंद्धार एकादशी मंडळाकडून २००६ मध्ये करण्यात आला.

कार्तिकोत्सव आश्विन वद्य १ ते कार्तिक वद्य १ या एक महिन्यात साजरा होतो. दररोज पहाटे ४.४५ ते सकाळी ६ पर्यंत काकडा आरती, त्रिपुरी पौर्णिमेला श्री लक्ष्मीकांताची पूजा बांधण्यात येते. श्री लक्ष्मीकांत व श्री हनुमानावर अभिषेक करण्यात येतो. तुलसी विवाह, सायंकाळी त्रिपूर उजळले जातात. नंतर आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्प, कीर्तन कार्यक्रम होतात. कार्तिक वद्य १ रोजी पहाटे लळिताची काकडा आरती नंतर सांगता सभा आणि दुपारी महाप्रसाद असतो- सुनील सहस्रबुद्धे, केळ्ये,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 28/Oct/2025