संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेला दरवर्षी पुराचा मोठा फटका बसत असून, याचे मुख्य कारण म्हणने सोनवी आणि शास्त्री नदीतील साचलेला गाळ आहे. या दोन्ही नद्यांमधील गाळ गाडीने उपसा करण्यात यावा, अशी मागणी संगमेश्वरमधील स्थानिकांकडून केली जात आहे.
सोनवी नदीत गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे यामुळे नदीचा प्रवाह मंदावला असून, पूवीं सुरू असलेला होडी प्रवासही बंद झाला आहे. संगमेश्वरजवळील निखळेवाडी परिसरातील होडी बांधणी व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रातील गाळ आणि झाडाझुडपांमुळे नदीला हवाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, संगमेश्वर बाजारपेठेसह कसबा, माखजन, फुगणूस या बाजारपेठांना पुराचे पाणी शिरते आणि मोठे आर्थिक नुकसान होते.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त केली आहे. नदीकिनारी असलेल्या भातशेतीवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून, शेतीचे नुकसान होत आहे. चौपदरीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननामुळे नदीपात्रात भराव साचल्यामुळे पाणी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात येत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सोनवी आणि शास्त्रीनदीतील गाळ उपसा तातडीने करून नदीचा प्रवाह सुरळीत करावा जेणेकरून पुराचा धोका आणि बाजारपेठेचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी प्रशासनाकडे होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 29/Oct/2025













