दापोली : तालुक्यातील पिसई गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रयत्नावरून मंगळवारी गोंधळ उडाला. वीज मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह उद्धव सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पिसई येथील रहिवासी भरत येसावरे यांच्या घरात हा प्रकार घडला. त्यांच्या मते, वीज मीटर फॉल्टी नसतानाही कर्मचाऱ्यांनी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला. येसावरे यांनी तातडीने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारानंतर माजी नगराध्यक्षा ममता मोरे, तालुकाप्रमुख संदीप चव्हाण, नगरसेवक ऋषिकेश गुजर, शहरप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी थेट दापोलीतील काळकाई कोंड परिसरातील महावितरण कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तीव्र शब्दांत जाब मागितला. फॉल्टी नसलेल्या मीटरवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. सरकार एकीकडे सक्ती नसल्याचे सांगते आणि दुसरीकडे महावितरण जबरदस्ती करत आहे, हे जनतेला फसवण्याचे दुटप्पी धोरण आहे, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली.
स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय सुरू असल्याचा आरोप करत, महावितरण अधिकाऱ्यांची दादागिरी आता चालणार नाही, जनतेच्या विरोधात कुणी वागले तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे
दरम्यान, महावितरण अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत भूमिका न सांगता वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे एवढेच सांगून गप्प बसणे पसंत केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 29/Oct/2025










