रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिना संपत आला तरी मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यात सकाळी ऊन, दुपारी पावसाच्या सरी आणि रात्री कडाक्याची थंडी वाजत आहे. सततच्या वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत असून सिव्हिल रुग्णालय, खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढत आहेत. जिल्ह्यातील दवाखाने रूग्णांनी हाऊसफुल्ल होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात चार महिने पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबर हिटचा त्रास सुरू झाला, कड़क ऊनाबरोबरच घामाने रत्नागिरीकर वैतागले होते. त्यानंतर दोन दिवस पावसाने हजेरी लावली. तात्पुरत्या दिलासानंतर पुन्हा उकाडा जाणवत होता. ऑक्टोबर महिना संपत आला तरी वातावरण बदलाचा लंपडाव सुरूच आहे. गणेशोत्सव, दसरा, नवरात्रीसह दिवाळीनंतर ही अवेळी पावसाने हजेरी लावली. दिवसा ऊन, सायंकाळी पावसाची हजेरी, पहाटे थंडी अशा बदलत्या हवामानामुळे साथीचे आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरूण, तरूणी, महिला आजारी पडत आहेत. अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रूग्णांची सिव्हील हॉस्पीटलसह खासगी दवाखान्यात मोठी गर्दी वाढत आहे. लहान मुलांना ही ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांनी तब्येत संभाळावी, लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे, मेडिकलमधून परस्पर गोळ्या घेऊ नये असेही आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
खरेदीदरम्यान संसर्ग वाढला
दसरा, दिवाळीच्या खरेदीकरिता रत्नागिरी शहरास तालुक्याती बाजारपेठेत नागरिकांची झुंबड पाहावयास मिळाली. दिवाळी सुट्ट्यांमुळे एसटीने गाव गाठण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वाढत्या गर्दीमुळे एकमेकांना संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.
सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढत आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. काहीदिवस वातावरणात बदल असणार आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्यावी- डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 30/Oct/2025














