रत्नागिरी : जिल्ह्यातील खाड्यांमधून वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाचवेळा निविदा प्रक्रिया राबवूनही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ड्रेझरने वाळू उपसा करण्यासाठी २२गटांपैकी ६ गटांचाच लिलाव झाला असून १६ गटांकडे मात्र वाळू व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे.
जिल्हा प्रशासनाला सहा गटातील वाळू लिलावातून जवळपास आठ कोटीचा महसूल प्राप्त झाला असून यातून १ लाख ३१ हजारहून अधिक ब्रास वाळू उपसा होणार आहे. यापूर्वी वाळू गटांसाठी मोठी चढाओढ दिसून येत होती. परंतु यावेळी अनेक गटांकडे वाळू व्यावसायिकांनी पाठ फिरवल्यामुळे नेमके यातील इंगित काय आहे याची चर्चा आता होऊ लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ, जयगड, बाणकोट या तीन खाड्यांमधील विविध भागांमधून वाळू उपसा करण्यात येतो. यात हातपाटी व ड्रेजरचा समावेश आहे. काही भागांमध्ये हातपाटीला परवानगी देण्यात येते तर काही ठिकाणी ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनातर्फे परवानगी देण्यात येते. जिल्हयातील या प्रमुख खाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून हायड्रोग्राफी सर्वे ककरुन ठिकाणे ड्रेजरमार्फन वाळू उत्खननासाठी निश्चित केली आहेत. यातील जयगड खाडीत ९, दाभोळ खाडीत १०, बाणकोट खाडीमध्ये ३गट निश्चित करण्यात आले होते.
यासर्व ठिकाणी लिलावही पुकारण्यात आले. मात्र वाळू उत्खननासाठी व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. वाळू उत्खननाबाबत सहावेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावेळी बावीस पैकी सहा गटांसाठी लिलावाला प्रतिसाद मिळाला. यात ड्रेजरने वाळू उत्खननासाठी जयगडमध्ये १, दाभोळमध्ये चार तर बाणकोट खाडीत १ गटाला प्रतिसाद मिळाला आहे. यातून ७ कोटी ९६ लाख ७० हजार ६६७ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. या सहा गटात १ लाख ३१ हजार ७५५ ब्रास वाळू उपशाला परवानगी देण्यात आली आहे. ही मुदत तीन वर्षासाठी असून ९ जूनपर्यंत वाळू उपसा संबंधितांना करता येणार आहे.
उर्वरित सोळा वाळू गटांमध्ये ३ लाख ९६ हजार ६७० ब्रास वाळूचा साठा खाड्यांमध्ये उपलब्ध असून यासाठी प्रशासनाने लिलावासाठी २३ कोटी ८० लाख दोन हजार इतकी रक्कम निश्चित केली आहे. वेगवेगळ्या गटांसाठी प्रत्येकी वेगळी रक्कम असून त्यावर लिलाव पुकारण्यात आला होता. परंतु वाळू व्यावसायिकांकडून याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 30/Oct/2025














