चिपळूण : महानिर्मिती कंपनीने तंत्रज्ञ ३ भरतीचा निकाल जाहीर करताना उमेदवारांचे गुण आणि उत्तरतालिका जाहीर न केल्याने निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. त्या विरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. इंटक फेडरेशन या वीज कामगार संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. चिपळूण तालुक्यातील अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील ५० विद्यार्थी पहिल्या फेरीत उत्तीर्ण झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी महानिर्मिती कंपनीने नोकर भरतीची प्रक्रिया राबविली होती. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्रातून १९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ९७४ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानिर्मितीमध्ये एवढी मोठी भरती पहिल्यांदाच होत आहे.
यापूर्वी २०१०, २०१६, २०१९ ला भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण आणि उत्तरपत्रिका सार्वजनिक करण्यात आली होती. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ७५ पैकी किती गुण मिळाले, हे जाहीर केले होते. यावेळी मात्र विद्यार्थ्यांचे गुण जाहीर केले नाहीत. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकाही सार्वजनिक केलेली नाही.
महाजेनको तंत्रज्ञ – ३ भरतीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी केवळ निकाल नसून, पारदर्शकतेवरील विश्वासाचा कस आहे. निकाल जाहीर करताना गुण लपवले. हा विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय आहे. सरकार आणि महाजेनको गप्प का?, भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर राज्य सरकार आणि महाजेनको प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. प्रकाश गायकवाड, महासचिव, इंटक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 30/Oct/2025












