खेड : तालुक्यातील सवणस खुर्द येथे महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लोखंडी खांबाला विद्युतप्रवाह लागून एका शेतकऱ्याची म्हैस जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. विनायक पंतक तांबे या शेतकऱ्याने या घटनेबाबत आमदार भास्कर जाधव यांना लेखी निवेदन देत योग्य ती कार्यवाही आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
तांबे हे आपल्या म्हशीला चारण्यासाठी वाडीतील रानात घेऊन गेले असता, तेथील महावितरणच्या एका जुन्या लोखंडी खांबाला विद्युतप्रवाह सुरू होता. म्हैस त्या खांबाजवळ गेल्याने तिला जोराचा धक्का बसून ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला, तांबे यांच्या म्हणण्यानुसार, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ही घटना पाहिली. थोडक्यात माझा जीव वाचला. सवणस खुर्द गावात १९७० पासून लोखंडी खांब बसवलेले असून, त्यांची देखभाल केली जात नाही, असेही त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हशीच्या दुधावर चालतो. त्यामुळे मला याची योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी आमदारांकडे केली आहे. तसेच जुन्या लोखंडी खांबांऐवजी सिमेंटचे खांब बसवावेत, अशीही मागणी अर्जाद्वारे केली आहे. स्थानिक नागरिकांनीही महावितरणच्या बेफिकीर कारभाराबर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 30/Oct/2025












