Ratnagiri : जिल्हा ग्राहक तक्रार इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्या उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ९.३० वा. होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नूतनीकरण कार्याचा प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील असलेल्या या आयोगाच्या इमारतीमध्ये हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमास रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष इंदुमती मलुष्टे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यालय अधिक सुबक, सुसज्ज व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा नूतनीकरणाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कामामुळे नागरिकांना तक्रार नोंदवणे आणि त्यावर तत्पर निर्णय मिळवणे अधिक सोयीस्कर होईल. या समारंभाचे आयोजन रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. वकील, ग्राहकांसह रत्नागिरीकरांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव अॅड. रत्नदीप चाचले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 30/Oct/2025