रत्नागिरी: कोकणात क्रीडा पर्यटनाला (Sports Tourism in Konkan) चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने (Ratnagiri Cyclist Club) सलग तिसऱ्या वर्षी ‘रोलर कोस्टर सायक्लोथॉन’ (Roller Coaster Cyclothon) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी हा सायकलिंगचा थरार रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे. भाट्ये ते गावखडी आणि परत अशा ५० किमीच्या या आव्हानात्मक स्पर्धेत देशभरातील २०० हून अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत.
यंदा या स्पर्धेत प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी २५ किमीचा विशेष गटही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आज हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व बक्षीस वितरण
स्पर्धेचे उद्घाटन रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:०० वाजता भाट्ये येथून सन्माननीय जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते होईल. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सकाळी १०:०० वाजता हॉटेल विवेक येथे राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडणार आहे.
“जो दिमाग से खेलेगा वही जितेगा”
“जो दिमाग से खेलेगा वही जितेगा” (He who plays with his mind will win) ही या स्पर्धेची टॅगलाईन असून, कोकणातील आव्हानात्मक मार्गावर केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक क्षमतेचाही कस लागणार आहे.
५० किमी मार्ग: भाट्ये येथून स्पर्धा सुरू होईल व कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, मेर्वी, गावखडी या मार्गावरून पुन्हा त्याच मार्गाने भाट्ये येथे संपणार आहे.
२५ किमी (शालेय गट): भाट्ये ते गोळप धार व तिथून परत भाट्ये असा मार्ग असेल.
मार्गावर विविध ठिकाणी पाणी, सरबताची व्यवस्था तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहयोगाने ढोल-ताशांच्या गजरात स्पर्धकांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे जय हनुमान मित्र मंडळ देखील रूट सपोर्ट करणार आहे.
१ लाख ७५ हजारांची बक्षिसे
रोलर कोस्टर सायक्लोथॉनमध्ये पुरुष व महिलांसाठी विविध वयोगट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ११ ते १७ वयोगटातील मुले (शालेय गट), १८ ते ३५ वयोगट (एलाईट ग्रुप), ३६ ते ५० वयाचा (मास्टर ग्रुप) आणि ५१ च्या वरील (ज्येष्ठ नागरिक) स्वतंत्र गट आहेत.
यातील विजेत्यांना १ लाख ७५ हजार रुपयांची रोख बक्षीसे, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. तसेच, स्पर्धा वेळेत पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेची जय्यत तयारी
स्पर्धकांना १ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजल्यापासून हॉटेल विवेक येथे बिब नंबरचे (Bib Number) वितरण केले जाणार आहे. याच वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या ज्या सायकलपटूं व धावपट्टूंनी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
स्पर्धेच्या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केली आहे. तसेच मार्गावर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णवाहिका व डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
‘सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया’ हे ध्येय
या स्पर्धेविषयी बोलताना क्लबच्या सदस्यांनी सांगितले की, “रत्नागिरीची ओळख ‘सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया’ व्हावी, येथून ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ किंवा आशियायी गेम्ससारख्या स्पर्धांसाठी उत्तमोत्तम सायकलपटू तयार व्हावेत आणि सायकल टुरिझम वाढून सायकलचा उपयोग अर्थार्जनासाठी व्हावा, हा या स्पर्धेमागील मुख्य हेतू आहे.”
सर्वांमुळेच स्पर्धा यशस्वी: प्रायोजकांचे भक्कम पाठबळ
सलग तिसऱ्या वर्षीही हॉटेल विवेकने या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून बहुमोल सहकार्य केले आहे. देशभरातील स्पर्धकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था हॉटेल विवेकच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी सुवर्णसूर्य फाउंडेशन (सहप्रायोजक), टिलेज (अॅपरल पार्टनर), रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (असोसिएट पार्टनर), निरंजन सुर्वे (ट्रॉफी पार्टनर), इनर्झल (एनर्जी पार्टनर), अॅड प्लस (एचटूओ पार्टनर), आणि बॉन अपेटाईट (न्युट्रिशन पार्टनर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ही स्पर्धा आता केवळ क्लबपुरती मर्यादित न राहता विविध संस्था व व्यक्तींच्या सहकार्यामुळे ‘समस्त रत्नागिरीकरांची’ झाली आहे.
पत्रकार परिषदेला रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, विनायक पावसकर, अॅड. सचिन नाचणकर, प्रसाद हातखंबकर, अभिजित पड्याळ, विशाल भोसले, प्रथमेश प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
सर्व रत्नागिरीकरांनी या सायकल स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी २ नोव्हेंबरला पहाटे ६:०० वाजता भाट्ये येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 30-10-2025












