रत्नागिरी : अरबी समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे गेल्या आठ दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. तुफान वाऱ्यांमुळे आणि अजस्त्र लाटांमुळे मच्छीमारी नौका जिल्ह्यातील बंदरात विसावल्या आहेत. याचा मोठा परिणाम मासळी बाजारावर झाला असून, माशांचे दर वधारले आहेत. सुरमईचा दर ५०० वरून थेट ८०० ते १२०० रुपये किलो झाला आहे, तर पापलेट ७०० वरून १५०० पर्यंत पोहचल्याने खवय्यांचे तोंड कडू झाले आहे.
हवामानखात्याने मागील आठवड्यापासून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता. अरबी समुद्रात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने शेकडो नौका परत बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून बाजारात माशांची आवक पूर्णपणे बंद असल्याने खवय्यांचा भ्रमनिरास झाला आहे. बुधवारी मासांहारी प्रेमींचा खास दिवस; पण या आठवड्यात अनेकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. सुरमईचा किलोचा दर ५०० वरून थेट ८०० ते १२०० झाला आहे. पापलेट ७०० वरून १५०० पर्यंत पोहोचला आहे. बांगडा १५० वरून ३०० दरम्यान विकला जात आहे. कोळंबी, सरंगा, मोडोसा यांचे दर २५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामातील अनेक दिवस वादळसदृश परिस्थितीमुळे फुकट गेले आहेत.
मासेमारी ठप्प झाल्यामुळे मासळी बाजारातील आवक थांबली आहे. परिणामी, मासळीचे दर गगनाला भिडल्याने मासळीप्रेमींसाठीही हा बुधवार रिकामा गेला. हवामान अनुकूल झाल्यावरच मासेमारी पुन्हा सुरू होईल तोपर्यंत मासळीप्रेमींना वाट पाहावी लागणार आहे. अरबी समुद्रातील मौथा चक्रीवादळामुळे हा परिमाण दिसत आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असून, ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस सुरू झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 30/Oct/2025












