लांजा : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षी कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, फलोत्पादान तसेच यांत्रिकीकरणांसंबंधी अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार यांनी केले आहे.
कृषी समृद्धी योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठीचे अर्ज वेबसाईटवरून महाडीबीटी पोर्टलवर करावयाचे आहेत. htts://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin त्यासाठी ही वेबसाईट देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. सिंचन सुविधांमधून शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटारपंप, डिझेल/पेट्रोल इंजिन, पाईपसंच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचनाकरिता अनुदान देण्यात येणार आहे. सिंचन संलग्न योजनेमधून ठिबक व तुषार सिंचनाकरिता २० गुंठे ते ५ हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल. या अंतर्गत लहान व सीमांत शेतकरी, इतर शेतकरी व अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकरी यांच्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा वेगवेगळी आहे. फलोत्पादनमध्ये हरितगृह, शेडनेट, मल्चिंग पेपर, वीडमॅट, पॅकहाऊस, फळप्रक्रिया केंद्र, आंबा पुनरूज्जीवन, रोपवाटिका उभारणी व औषधी, मसाला, फूलशेती क्षेत्रविस्तार याकरिता अनुदान मिळणार आहे. फलोत्पादनाशी संलग्न स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत १० गुंठे ते १० हेक्टरपर्यंत लाभ घेता येतील तसेच यांत्रिकीकरणातून ट्रॅक्टर, पॉवरटिलर, पॉवरविडर, ब्रशकटर, फवारणी पंप, भातकापणी यंत्र, कडवा कुठ्ठी, श्रेडर, वूडचीपर, सुपारी काढणी यंत्र इत्यादी यंत्र अवजारांवर ४० व ५० टक्के अनुदान मिळेल, असे शेलार यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 30-10-2025











