Khed : एस.टी. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत वृद्धेच्या बोरमाळेची चोरी

खेड : खेड एस.टी. बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ आणि रोकड असा एकूण साडेएक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली असून, फिर्यादीने तब्येतीमुळे उशिरा म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रभावती सदानंद मोरे (७४, मूळ रा. बिरमणी, पो. कळमनी वरचीवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या रा. कुर्ला नेहरू नगर, पोलीस लाईन, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मुलाला भेटण्यासाठी चिपळूणला जात होत्या. खेड बसस्थानकावर रत्नागिरी-चिपळूण मार्गावरील बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पर्समधून सोन्याची बोरमाळ आणि ५०० रुपये रोख अशी एकूण १ लाख २० हजार ५०० रुपयांची चोरी केली. सोन्याची बोरमाळ ही सुमारे ११ ग्रॅम ३० मिली वजनाची, षटकोनी आकाराच्या मण्यांची होती. पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 31/Oct/2025